हॅप्पी व्हॅलेंटाइन डे

आज "व्हॅलेंटाइन डे!' जगभरात साजरा होणारा प्रेमदिन. "प्रेम' या भावनेवरच "प्रेम' करणार्‍यांना खरं तर असे "दिन' वगैरे साजरे करायची गरज पडत नाही. पण प्रेमात प्रतीकांनाही महत्त्व आहेच. "व्हॅलेंटाइन डे' हे असंच प्रेमाचं एक प्रतीक आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करावं, एवढंच या "डे'चं सांगणं आहे......... 

प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे, असे समीकरणच सध्या रूढ झाले आहे. दर वर्षी लाखोंच्या संख्येने अनेक तरुण-तरुणी अक्षरशः उत्सवासारखा हा दिवस साजरा करतात. भेटवस्तू, शुभेच्छापत्रे, फुले यांच्यावर हजारो रुपये खर्च करतात. चित्रपटांतूनही प्रेमाचे अतिशय भडक रूप सादरे केले जात आहे. या गोष्टीला विविध स्तरांतून विरोधही होत आहे; पण प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण का? 

प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते राधा-कृष्णाचे प्रेम, आई- वडिलांचे प्रेम, बहीण-भावांचे प्रेम,गुरू-शिष्यांचे प्रेम. प्रेमातूनच अनेक नातेसंबंधांच्या रेशीमगाठी गुंफल्या जातात. प्रेम ही एक अशी निसर्गसुलभ भावना आहे, जी ठरवून करता येत नाही. प्रेम कुणीही, कुणावरही, कधीही करावे; पण ते मनापासून आणि निःस्वार्थीपणे करावे व त्यातून मिळणारा आनंद मौल्यवान वस्तूप्रमाणे जतन करावा. 

प्रेमाची सुरवात आपल्या घरापासूनच होते. आईचे मुलांवरील प्रेम हे तर जगातील आठवे आश्चर्यच ठरेल. आचार्य अत्र्यांची "दिनूची गोष्ट' तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आईने सांगितलेल्या कामांमुळे दिनू वैतागतो अन्‌ आपण दिवसभरातील केलेल्या छोट्या- छोट्या कामांचे पैशाच्या स्वरूपात बिल करून आईला देतो; परंतु आई मात्र एकही पैसा न घेता आपल्या मुलांवर प्रेम करते, रात्रंदिवस कष्ट करते, त्यांचे संपूर्ण आयुष्यच घडवते. आईच्या प्रेमामुळेच श्यांमचे "साने गुरुजी' बनले. खरंच, किती निर्व्याज प्रेम! जन्मभर आपल्यासाठीच झटणार्‍या आई-वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात दाखल करण्यापेक्षा आपण त्यांच्यावर निःस्वार्थीपणे प्रेम का करू नये? 

पण प्रेम काय फक्त माणसांवर करावे का? प्रेम ज्ञानावर करता येते अन्‌ विज्ञानावरही करता येते. प्रेम निसर्गावर करता येते, प्रेम कलेवर करता येते, प्रेम समाजावर करता येते अन्‌ प्रेम देशावरही करता येते. 

या देशप्रेमापोटीच तर आपल्या देशातील असंख्य राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्यवेदीत आहुती दिली. १५० वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजही आपले जवान सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहेत ते केवळ देशप्रेमापोटीच! म्हणूनच मातृभूमीवरील प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

आपल्या प्रिय पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी शहाजहानने ताजमहालासारखी अप्रतिम वास्तू निर्माण केली. आजही ताजमहाल जगातील सात आश्चचर्यांपैकी एक म्हणून दिमाखात उभी आहे. पण अशी वास्तू पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून शहाजहानने महाल पूर्ण झाल्यानंतर सर्व मजुरांची बोटे तलवारीने छाटून टाकली. किती स्वार्थी भावना! परंतु ज्यांच्या हातांची बोटे कुष्ठरोगाने झडली आहेत, घरच्यांनीही ज्यांच्याकडे पाठ फिरवली आहे अशा कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी "आनंदवन' उभारले. त्यांचा स्वतःच्या कुटुंबीयांप्रमाणे सांभाळ केला. शिक्षण देऊन आत्मसन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वायस दिला. याच झडलेल्या बोटांनी या कुष्ठरोग्यांनी स्वतःची घरे बांधली, शेती फुलवली, वस्त्रे विणली, भेटकार्डे रेखाटली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाचा वर्षाव केला. दोन वर्षांपूर्वी अशा या कर्मयोग्याला व त्यांच्या अफाट कार्याला भेट देऊन मी कृतकृत्य झाले अन्‌ प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालापेक्षा मला आनंदवन श्रेष्ठ वाटले. 

वन्य प्राण्यांवरील प्रेमाला तर पुरातन काळापासूनची पार्श्व्भूमी लाभली आहे. शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने- "वाघ्या"ने त्यांच्या मृत्यूनंतर चितेत उडी घेतली, तर राणा प्रतापांच्या घोड्याने- "चेतक"नेही त्यांच्याबरोबरच प्राण सोडले. खरंच, किती हे प्रेम! 

आजही आपल्या समाजात प्राणिप्रेम करणारे असंख्य लोक आहेत. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथे आदिवासी लोकांनी घायाळ केलेल्या पशू-पक्ष्यांसाठी अनाथालय उभारले. मारुती चित्तमपल्ली अभयारण्यात जाऊन वन्य जिवांशी संवाद साधतात. स्टीव्ह आयर्विन या ऑस्ट्रेलियन युवकाने तर चक्क मगरी, साप, अजगर या अंगावर शहारा आणणाऱ्या हिंस्र श्वापदांवर प्रेम केले. त्याचे या प्राण्यांवर इतके प्रेम होते, की त्याच्या सर्वांत आवडत्या मगरीचे नाव "बिंडा' हेच त्याने त्याच्या पहिल्या मुलीला ठेवले. या प्राणिप्रेमामुळेच तर डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेटसारख्या वाहिन्या जन्माला आल्या. 

प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नव्हे, तर प्रेम म्हणजे त्याग, विश्वारस, सामंजस्य, एकरूपता. परंतु सध्या चित्रपटांतून प्रेमाच्या नावाखाली अश्ली लता, सूडबुद्धी, विवाहबाह्य संबंध, एकतर्फी प्रेमातून खून असे प्रेमाचे हिंस्र रूप सादर केले जाते. त्यामुळे तरुण पिढीवर अतिशय वाईट परिणाम होत आहेत. म्हणूनच जर प्रेमाच्या संकल्पनेत बदल घडवून देशप्रेम, समाजप्रेम, निसर्गप्रेम अशा विविध विषयांवर जर चित्रपट बनवले तर चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ येईल व तरुण पिढीचेदेखील समाजप्रबोधन होईल. 

आज आपल्या देशात अंध, अपंग, अनाथ, मूक-बधिर असे अनेक जीव आहेत. एड्‌स व कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशा पीडितांना आज सहानुभूतीपेक्षा आपल्या प्रेमाची खरी गरज आहे. त्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी अशा रुग्णांसाठी संघटना उभारून त्यांना केवळ आर्थिक स्वरूपात मदत न करता त्यांना प्रेमाचा हात द्यावा. 

"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे मंगेश पाडगावकरांचे शब्द आपल्या परिचयाचेच आहेत. 

इतके प्रेमळ आई-बाबा, जिवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी, भरभरून आनंद देणारा निसर्ग, निर्व्याज प्रेम करणारे पशू-पक्षी, मोहिनी घालणारी कला, सर्व काही देणारा समाज, आपल्यासाठी झटणारे समाजसेवक आणि आपल्या प्राणप्रिय देश हे सर्व आपल्याला या जीवनात मिळाले आहे ते स्वर्गसुखाहून काही वेगळे आहे का? भरभरून मिळणारा आनंद यांच्याच प्रेमातून आपल्याला मिळतो, म्हणूनच यांच्यावर शतदा प्रेम करावे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;